धुळे – अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क
धुळे शहरातील देवपूर आणि रेल्वे स्टेशन परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण करणाऱ्या कृषी विद्यापिठ, धुळे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आज लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलन सुरू करताच बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आहे .या विभागाने आठ दिवसात या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. जनतेच्या सुख सुविधाच्या आड येणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कामसुकारपणा केल्यास आपण त्यांना सोडणार नसल्याचा इशारा यावेळी माजी आमदार गोटे यांनी दिला.
धुळे शहरात रहदारीची मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी पुतळा ते रेल्वे स्टेशन रोड या भागाला जोडणारा रस्ता करण्याचे काम माजी आमदार अनिल गोटे यांनी हाती घेतले .यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला उपलब्ध झाला आहे. हा रस्ता धुळ्याच्या कृषी महाविद्यालयाच्या 900 मीटर जागेतून जाणार असल्याने या रस्त्याच्या कामाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मंजुरी दिली. पण कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे या रस्त्याचे काम रखडले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील रस्त्याच्या कामात दिरंगाई केली. विशेषता धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने देखील या रस्त्याच्या कामात अडथळेच निर्माण केल्याचा आरोप गेल्या आठवड्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. यावेळी त्यांनी देहत्याह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शिवतीर्थ नजीकच्या कल्याण भावना पासून सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत मोर्चा काढत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांच्या दालना बाहेर पोर्चमध्ये माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या समर्थकांसह ठिय्या मारत आंदोलन सुरू केले. यावेळी लोकसंग्राम पक्षाचे तेजस गोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, विजय वाघ, माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे, सलीम शेख, अकबर शेख ,प्रकाश महानोर, वामनराव मोहिते, सुरेश जैन, मनीष थोरात यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर प्रचंड घोषणाबाजी करीत या तीनही प्रशासनाचा निषेध केला. यानंतर माजी आमदार अनिल गोटे ,अधीक्षक अभियंता अनिल पवार तसेच अभियंता आर आर पाटील यांची आंदोलन ठिकाणीच बैठक झाली. या बैठकीत गोटे यांनी या कामास दिरंगाई होण्याचे कारणच काय ,असा प्रश्न उपस्थित केला. हा नवीन रस्ता धुळे शहरातील रहदारीची समस्या सोडवणारा रस्ता आहे. मात्र प्रशासन निधी मंजूर असून देखील अडवणुकीचे धोरण ठेवणार असेल तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. विशेषता कृषी महाविद्यालयातील अधिकारी हे साक्री तालुक्यातील रहिवासी असून ते माजी खासदार सुभाष भामरे यांच्या इशाऱ्याने रस्त्याची अडवणूक करीत असल्याचा खळबळ जनक आरोप देखील यावेळी गोटे यांनी केला. जिल्ह्याला उपलब्ध झालेला निधी जुलै अखेर परत गेल्यास आपण कामाची अडवणूक करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अधीक्षक अभियंता पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत हे काम आपण तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. आठ दिवसात या ठिकाणी कच्चा रस्ता केला जाईल, त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री वापरली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार गोटे यांनी हे आंदोलन तुर्त आठ दिवसांसाठी स्थगित केले आहे. विशेष म्हणजे आता पुन्हा रस्त्याच्या कामात अडवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
